SAFF फुटबॉल स्पर्धेचे भारत नवव्यांदा विजयी
बंगळुरु, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय फुटबॉल संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये कुवेतवर ५-४ने मात करून सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताचा गोलकीपर गुरप्रितसिंग संधूने उत्कृष्ट बचाव करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीतही संधूने शूटआउटमध्ये भक्कम बचाव केला होता.
कंठीरवा स्टेडियममध्ये ही फायनल रंगली. या लढतीसाठी चाहत्यांचा मोठा प्रतिसाद भारतीय संघाला मिळाला.फिफा क्रमवारीत भारत १००व्या, तर कुवेत १४१व्या क्रमांकावर आहे. मागील चार आंतरराष्ट्रीय लढतीत कुवेतने दोन वेळा भारताला नमविले होते, तर एक लढत भारताने जिंकली होती आणि एक लढत बरोबरीत सोडविली होती. याच स्पर्धेत भारत-कुवेतमधील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यात भारताने उपांत्य फेरीत लेबनॉनवर पेनल्टी शूटआउटमध्येच मात केली होती. त्यामुळे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा कस लागेल, हे निश्चित होते. आणि घडलेही तसेच.
भारतीय संघ या स्पर्धेत नवव्यांदा चॅम्पियन ठरला. भारताने यापूर्वी १९९३, १९९७, १९९९, २००५, २००९, २०११, २०१५, २०२१मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.
ML/KA/SL
5 July 2023