डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यात भारत जगात प्रथम क्रमांकावर

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यात भारत जगात प्रथम क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) प्रणालीचा अधिकाधीक वापर करून नागरीक टेक्नोसॅव्ही झाले आहेत.2016 पासून सुरु झालेली प्रणाली आता सर्व स्तरांतील भारतीय नागरीक अगदी सहजपणे हाताळत आहेत. भारतात केल्या जाणाऱ्या सर्व पेमेंटपैकी 40% पेक्षा जास्त पेमेंट डिजिटल आहेत, ज्यात युपीआयचा सिंहाचा वाटा आहे. त्याचा वापर 30 कोटींहून अधिक व्यक्ती आणि 5 कोटींहून अधिक व्यापारी करतात.
फुटपाथ वरील सामान्य विक्रेत्यांपासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्व स्तरांवर युपीआय चा वापर होतो. 2022 च्या आकडेवारीनुसार, आज जगातील सर्व देशांमध्ये, भारत हा सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे, ज्याचा वाटा जवळपास 46% आहे. भारतानंतर ब्राझील, चीन, थायलंड आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. सन 2016 मध्ये केवळ एक दशलक्ष व्यवहार करणाऱ्या युपीआय ने आता 10 अब्ज (1,000 कोटी) व्यवहारांचा टप्पा पार केला आहे.
युपीआयने भारतीयांच्या व्यवहार पद्धतीत सर्वात मोठा बदल घडवला आहे. जागतिक डेटा संशोधनानुसार, 2017 मध्ये एकूण व्यवहाराच्या 90 टक्के असलेले रोख व्यवहार हे आता 60 टक्क्यांहून कमी झाले आहेत. सन 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद केल्यानंतर सहा महिन्यांत, युपीआय द्वारे एकूण व्यवहाराचे प्रमाण 2.9 दशलक्ष वरून 72 दशलक्ष पर्यंत वाढले. वर्ष 2017 सरताना, युपीआय व्यवहारात गत वर्षाच्या तुलनेत 900 टक्क्यांनी वाढ झाली होती आणि तेव्हापासून त्याने त्याचा वाढीचा चढता आलेख कायम राखला आहे.
युपीआय व्यवहार वाढल्याने पेमेंटसाठी रोख रकमेची देवाणघेवाणच केवळ थांबली नाही तर इतर डिजिटल पेमेंट पद्धती देखील बदलत चालल्या आहेत. उदाहरणार्थ, व्यापारी पेमेंटसाठी डेबिट कार्डचा वापर वर्षागणिक घटत चालला आहे, आणि आज प्रीपेड वॉलेटचा वापर देखील युपीआय द्वारे बदलला आहे. युपीआय जसजसे निरंतर विकसित होत आहे आणि नवोन्मेष घडवत आहे, तसतसे ते भारताच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यामध्ये आणखी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
युपीआय सह रूपे क्रेडिट कार्डची संलग्नता म्हणजे डिजिटल पेमेंट पद्धतीतील एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड आणि युपीआय या दोन्हींचे एकत्र फायदे देते. युपीआय व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डद्वारे देऊ केलेल्या अल्प-मुदतीच्या पत पुरवठा सुविधेचा लाभ घेऊन, कार्डधारक आता त्यांच्या बचत खात्यातून पैसे काढण्याऐवजी त्यांच्या क्रेडिट लाइन वापरून देयक भरू शकतात.
SL/KA/SL
29 Oct. 2023