15 डिसेंबरपासून सुरू होणार भारत NCAP क्रॅश टेस्टिंग

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतीय सुरक्षा एजन्सी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP) चे उद्घाटन झाले. या स्वदेशी प्रोग्राममुळे भारतीय कार उत्पादक कंपन्यांना सुरक्षा रेटिंगसाठी त्यांच्या कार ग्लोबल NCAPकडे पाठवण्याची गरज नाही.कार ग्राहकांना बाजारात उपलब्ध असलेल्या वाहनांच्या अपघात सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी सुविधा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एखादा ग्राहक कार घेण्याचा विचार करत असेल, तर गाड्यांच्या सेफ्टी रेटिंगच्या आधारे तो कोणती कार घ्यायची हे ठरवू शकेल. भारत NCAP क्रॅश टेस्टिंग 15 डिसेंबरपासून सुरू होत असून यामध्ये भारतात उत्पादित कारचे सेफ्टी रेटिंग कळणार आहे.
आत्तापर्यंत, मेड इन इंडिया कारना ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टिंगमध्ये एडल्ट प्रवासी सेफ्टी आणि बाल प्रवासी सेफ्टी श्रेणींमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधारे एक ते पाच पर्यंत सेफ्टी रेटिंग दिले जात होते. आता हे फक्त भारत एनसीएपीमध्येच शक्य होईल. सध्या टाटा मोटर्स आणि महिंद्रा तसेच स्कोडा आणि फोक्सवॅगन यांसारख्या कंपन्यांच्या मेड इन इंडिया कारना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत एनसीएपीच्या पहिल्या बॅचमध्ये भारतीय आणि जपानी तसेच दक्षिण कोरियाच्या कंपन्यांच्या कारचे क्रॅश टेस्टिंग केले जाईल. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स तसेच महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश असणार आहे.Bharat NCAP अनिवार्य नाही, त्यामुळे ते त्यांच्या कारच्या सेफ्टी रेटिंगसाठी क्रॅश टेस्टिंगमध्ये सहभागी होतात की नाही हे ऑटोमोबाईल कंपन्यांवर अवलंबून आहे.
SL/KA/SL
2 Nov. 2023