भारतच तिसरी मोठी अर्थव्यवस्था! आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात जपानला टाकलं मागे
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती बुधवारी (दि. 25 सप्टेंबर) दिली. ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. या क्रमवारीत भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले गेले आहे. एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी बाह्य आक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे ठरविली जाते. त्या आधारे भारत अग्रेसर आहे, असे लक्षात आले. गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. या यादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे. तसेच, पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया भौगोलिकदृष्ट्या आशियामध्ये नसले तरी, ते आशियातील राजकारण, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतात. त्यांच्या प्रभावामुळेच आशिया पॉवर इंडेक्समध्ये त्यांचा समावेश केला गेला आहे.
PGB/ML/PGB
26 Sep 2024