देशभरात जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा काँग्रेसचा धोकादायक खेळ
धुळे / नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा अत्यंत धोकादायक खेळ काँग्रेस करत आहे, कारण काँग्रेस कधीच, दलित, मागास, आदिवासी जनतेचा विकास बघू शकत नाही, असा गंभीर आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विधानसभा प्रचारासाठीची त्यांची राज्यातील पहिली सभा आज धुळ्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचे लोक ना देश सुरक्षित ठेवू शकत,ना देशाचा सन्मान करू शकत, असे सांगत काँग्रेसचा हा जाती विभाजनाचा अजेंडा ओळखून, सर्व जातींनी एक राहावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एकदा रद्द झालेले ३७० कलम कोणत्याही स्थितीत पुन्हा लागू होणार नाही असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
येत्या पाच वर्षात महाराष्ट्राची यशोगाथा अशीच पुढे जात राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाविकास आघाडीच्या गाडीकडे इंजिन नसून चालक पदावर बसण्यासाठी स्पर्धा आहे, असा आरोप त्यांनी केला. महाआघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातलं कार्य जनतेने पाहिले आहे. केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आखल्या आहेत. महाराष्ट्रातही महिलांसाठी अनेक योजना सुरु झाल्या आहेत.
आमचे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगाने पावले उचलत आहे. मात्र विरोधी पक्ष त्या योजना बंद करण्यासाठी अपप्रचार करत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस पक्ष न्यायालयापर्यंत पोहोचला आहे, काँग्रेस पक्ष नारीशक्तीला सक्षम करू इच्छित नाही, असा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी माणसांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न पूर्ण केलं आहे, मात्र काँग्रेसनं आपल्या अनेक दशकांच्या काळात याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला.
धुळे जिल्ह्यात विरोधकांनी वोट जिहाद चा उपयोग केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला. या वोट जिहादमुळे लोकसभेत महायुतीचा मालेगाव आणि धुळ्यातून ४ हजार मतांनी पराभव झाला, मात्र विरोधकांच्या या वोट जिहादचं उत्तर जनतेने निवडणूकीतून द्यायचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
नाशिक इथेही आज मोदींची सभा झाली. गेल्या दहा वर्षात गरीब, शेतकरी यांना समोर ठेऊन त्यांचे आयुष्य सुधारेल, असे विकास प्रकल्प आणि योजना आमच्या शासनाने आणल्या. जेव्हा केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराच सरकार असते, त्यावेळी विकासाची गती दुप्पट असते याचा अनुभव महाराष्ट्रातले शेतकरी घेत आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. इथल्या शेतकऱ्यांना १२ हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत मिळत आहे, असे सांगत पुन्हा महायुतीचं सरकार आले तर ही मदत पंधरा हजारांपर्यंत वाढवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सोयाबीन, कापूस, दूध आणि ऊस उत्पादकांसाठी केलेल्या कामांचीही त्यांनी माहिती दिली. कांदा उत्पादकांच्या समस्या आणि भावना लक्षात घेऊन निर्यात धोरणात बदल केल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे युती सरकार मोठ-मोठे विकास प्रकल्प राबवत असताना, महाआघाडी मात्र प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याचाच अजेंडा राबवत आहे, असे ते पुढं म्हणाले.
नाशिक आज संरक्षणक्षेत्राच्या आत्मनिर्भरतेचे केंद्र बनले आहे. मात्र, देशाला दुर्बल करण्यासाठी संरक्षण क्षेत्राचाही राजकारणात वापर करत, काँग्रेसने एचएएल कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला,असेही मोदी म्हणाले. विरोधकांना संविधानाशी देण-घेणं नाही, डॉ आंबेडकरांची त्यांना काहीही परवा नाही, केवळ मतांसाठी खिशात कोरे संविधान घेऊन फिरणाऱ्या काँग्रेसने ७५ वर्ष जम्मु-कश्मीरमध्ये बाबासाहेबांचे संविधान लागू होऊ दिले नाही. ते आमचे सरकार आल्यावर लागू झाले, असेही त्यांनी सांगितले.
ML/ML/PGB 8 nov 2024