या दिवशी मुंबईत होणार INDIA ची बैठक
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने आता विरोधी पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपला पर्याय म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि यासाठी विविध राज्यांत विरोधी आघाडी इंडियाचं (INDIA) खलबतं सुरू आहे. पाटणा आणि बंगळुरूनंतर इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीचं नेतृत्व ठाकरे गट करणार आहे.
31 ऑगस्टच्या रात्रीपासून भाजपविरोधी आघाडीची बैठक सुरू होईल, यासाठी रात्री उद्धव ठाकरेंकडून विरोधी पक्षनेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील सांताक्रूझ-कलिना परिसरातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांची डिनर डिप्लोमसी होईल. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विरोधी पक्ष आघाडी ‘इंडिया’ची बैठक सुरू होईल. या बैठकीला विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेच दोन दिवसीय बैठकीचं नेतृत्व करतील.
SL/KA/SL
5 Aug 2023