भारताने चीन विरोधात केला डिजिटल स्ट्राइक

नवी दिल्ली, दि. १४ : भारत पाक संघर्षात नेहमीच पाकची पाठराखण करणाऱ्या चीनने ऑपरेशन सिंदूरबाबत देखील अपप्रचार केला आहे. याची गंभीर दखल घेत भारताने आज चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआच्या X हॅण्डलवर भारतात बंदी घातली आहे. चीनकडुन या माध्यमांद्वारे भारतीय लष्कराबाबत सातत्याने तथ्यहीन आरोप केले जात होते. यानंतर भारतीय दूतावासाकडून त्यांना कडक शब्दांत समजही देण्यात आली होती. बिजिंगस्थित भारतीय दुतावासाने ‘भारताविरुद्ध संभ्रम पसरवणारी माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी तथ्य तपासून पाहावे’, असे ग्लोबल टाइम्स न्यूजला बजावले होते. मात्र तरीही त्याची चिथावणीखोर भाषा सुरुच राहील्याने अखेर आज भारताने चीन विरोधात डिजिटल स्ट्राईकचे शस्त्र उगारले.
भारत-पाक संघर्षात भारतीय हवाई दलाचे एक राफेल विमान बहावलपूरजवळ पाडण्यात आल्याची खोटी बातमीही चीनकडून पसरवण्यात आली होती. PIB च्या Fact Check टीमने चीनच्या या दाव्याचे खंडन करत व्हायरल फोटो चुकीचे असल्याचे आणि मोगा जिल्ह्यात २०२१ मध्ये झालेल्या मिग- २१ च्या अपघाताचे असून त्याचा ऑपरेशन सिंदूरशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भारताने चीनच्या सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्स, शिन्हुआ आणि तुर्कीच्या सरकारी माध्यम टीआरटी वर्ल्डच्या एक्स अकाउंटवरील बंदी आता उठवली आहे. दोन्ही खाती फक्त ५ तासांसाठी ब्लॉक करण्यात आली होती.
त्याचबरोबर आज भारतीय दूतावासाने अरुणाचल मुद्द्यावरूनही चीनला फैलावर घेत या प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्यावर आक्षेप घेतला आहे. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग असून चीनकडून होणारे नामांतरण व्यर्थ असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे.