भारताकडून पाकिस्तानवर Air Strike, ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली, दि. ७ : भारताने काल रात्री १.३० वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-ऑक्युपाइड काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले आहेत. हा हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला आहे.बहावलपूर, मुरीदके, गुलपुर, भींबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद अशा ९ ठिकाणांवर हल्ला केला. मात्र भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं की हे हल्ले केवळ दहशतवादी ठिकाणांवर केले असून पाकिस्तानी लष्करी तळांना कोणतंही नुकसान झालं नाही.
भारताने या एअरस्ट्राइकची माहिती देताना म्हटलंय, की दहशतवाद्यांनी वापरलेल्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबाचं दहशतवादी लपण्याचं ठिकाण मरकज-ए-तैयबा उडवून देण्यात आलं आहे. भारताने हा हल्ला पीओकेच्या मुरीदके येथे केला आहे, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं.
भारताच्या एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने केलेल्या हल्ल्यांचा निषेध करत म्हटलं, की ‘धोकेबाज शत्रूने पाकिस्तानमध्ये पाच ठिकाणी भ्याड हल्ले केले आहेत आणि त्याला देश प्रत्युत्तर देईल. भारताने लादलेल्या या युद्धाच्या कृतीला पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि खरोखरच कडक प्रत्युत्तर दिलं जात आहे’.