भारताला सध्या कोरोनाची चिंता नाही – केंद्राचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटमुळे निर्माण झालेल्या आणिबाणीच्या स्थितीमुळे जगभर पुन्हा एकदा कोरोनाच्या भितीची लाट पसरली आहे. त्यातच आज भारतात अमेरिकेतून आलेली एक महिला रुग्ण कोरोनाच्या BF.7 या व्हॅरिएंटमुळे पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनच्या सब वेरियंट BF7 मुळं नव्यानं करोना रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही आता सावध झाले असून देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के. पॉल यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचं म्हटलं.
करोना संसर्गासंदर्भात आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला आढावा बैठक घेण्यात येणार आहे. देशात करोना चाचणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. आरोग्य मंत्रालय कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलेल, असं वीके पॉल म्हणाले. पॉल यांनी पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क लावण्याचं आवाहन केलं. बुस्टर डोसच्या लसीकरणाला देखील वेग देण्यात येईल, असं पॉल म्हणाले.
दरम्यान आज आरोग्य मंत्र्यांनी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रे दरम्यान कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आवश्यक काळजी घेण्यात आली नाही तर यात्रा स्थगित करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
SL/KA/SL
21 Dec. 2022