पाकिस्तानातून ४०० हिंदूंच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फाळणीच्या वेळी पाकीस्तानात राहण्याचा निर्णय घेणाऱ्या अनेक हिंदूंना आजही भारतभूमीचे वेध लागलेले असतात. देश बदलला तरीही त्यांच्या आस्था, श्रद्धा यांची भारताशी जोडलेली नाळ अद्याप अतूट आहे. हेच आत्ता घडलेल्या एका घटनेवरून दिसून येते. पाकिस्तानमधील कराची येथील जुन्या गोलीमार भागातील हिंदू स्मशानभूमीत वर्षानुवर्षे कलशांमध्ये ठेवलेल्या ४०० हिंदूच्या अस्थी काल अमृतसरमधील वाघा-अटारी सीमेवरून भारतात आणण्यात आल्या आहेत. हे अस्थिकलश सुमारे ८ वर्षे स्मशानभूमीत ठेवण्यात आले होते. मृतांचे कुटुंबिय या अस्थी गंगेत विसर्जित करण्याची वाट पाहत होते. महाकुंभ योग दरम्यान भारतीय व्हिसा मिळाल्यानंतर, रविवारी (२ फेब्रुवारी) कराची येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात एक विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. यानंतर, कुटुंबाने अस्थींना अंतिम निरोप दिला जेणेकरून त्यांना मोक्षासाठी गंगेत विसर्जित करता येईल.
तत्पूर्वी, बुधवारी (२९ जानेवारी) मोठ्या संख्येने भाविक जुन्या कराचीतील गोलीमार स्मशानभूमीत पोहोचले, जिथे राख असलेल्या कलशांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. हरिद्वारमध्ये ज्या कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांच्या अस्थींचे विसर्जन करायचे होते त्यांनी स्मशानभूमीत धाव घेतली, भारतात अस्थी विसर्जनासाठी स्मशानभूमीची स्लिप आणि मृत व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र अनिवार्य होते.
कराचीतील श्री पंचमुखी हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष श्री रामनाथ मिश्रा महाराज यांना भारतीय व्हिसा मिळाला आणि त्यांना मृतांच्या अस्थी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गेल्या ८ वर्षांपासून स्मशानभूमीत ठेवलेल्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याचा मार्ग मोकळा झाला. ते यापूर्वीही अस्थी विसर्जित करण्यासाठी भारतात आले होते.
SL/ML/SL
4 Feb. 2025