तेल विकून भारताने कमावला कोट्यवधींचा नफा

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना भारताने मुत्सद्दीपणा दाखवत एक अनोखे यश संपादन केले आहे. तेलाचा आयातदार राहीलेला भारत आता सध्या युरोपीय देशांना सौदी अरेबियापेक्षा जास्त तेल विकत असून, त्यातून मोठा नफा कमावत आहे.
‘द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’च्या म्हणण्यानुसार, युक्रेन-रशिया युद्धापूर्वी युरोप भारताकडून प्रतिदिन १.५४ लाख बॅरल शुद्ध तेल खरेदी करत असे; परंतु आता हा आकडा वाढून २ लाख बॅरल प्रतिदिन झाला आहे. मे २०२३ मध्ये यात आणखी वाढ होत हा आकडा तब्बल ३.६० लाख बॅरल प्रतिदिनवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील संधीचा फायदा घेत भारताने रशियाकडून कच्चे तेल विकत घेऊन त्याचे शुद्धीकरण करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करण्यास सुरुवात केली आहे. २०२१-२२ या वर्षात भारताने रशियाकडून १८ हजार कोटी रुपयांचे कच्चे तेल खरेदी केले होते. नंतर हा आकडा आणखी वाढला. २०२२-२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत रशियाकडून भारताची तेल आयात ८९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली, तेव्हा अमेरिका आणि युरोपीय देशांनी भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि जी ७ देशांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर किंमत मर्यादा घातली. असे असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही. भारताने रशियाकडून कच्चे तेल विकत घेतले, ते इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम इतर रिफायनरीजमध्ये शुद्ध करत ते युरोपियन बाजारपेठेत विकण्यास सुरुवात केली.
SL/KA/SL
22 May 2023