अमेरिकेतील मांसाहारी दुधाला भारताने केला मज्जाव
नवी दिल्ली, दि. १७ : भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेत एक अत्यंत संवेदनशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे — तो म्हणजे “मांसाहारी दूध”. अमेरिकेतील काही दुग्ध उत्पादक कंपन्या अशा गायींकडून दूध घेतात ज्यांना प्राणिज घटकांनी युक्त चारा दिला जातो. या चाऱ्यात डुक्कर, कोंबडी, मासे, घोडा, मांजर आणि कुत्र्याचे मांस, तसेच रक्त, फिश ऑइल, जिलेटिन आणि कोलेजन यांचा समावेश असतो. या प्रकारच्या आहारामुळे गायी अधिक दूध देतात, पण भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हे दूध अपवित्र मानले जाते. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना भारतानं अमेरिकेला आधीच सांगितलं आहे, की आम्ही आमच्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाहीत.
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, देशातील सुमारे ८ कोटी नागरिक दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. दूध हे भारतात केवळ अन्न नाही, तर धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे पवित्र घटक आहे. त्यामुळे अशा गायींकडून मिळणाऱ्या दुधाची आयात भारतात स्वीकारली जात नाही. भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की दुग्ध क्षेत्रात कोणतीही तडजोड होणार नाही.
अमेरिका, दुसरीकडे, भारताच्या या भूमिकेला “अनावश्यक व्यापार अडथळा” मानते आणि त्यांनी ही तक्रार WTO मध्ये नेली आहे. अमेरिकेचा दावा आहे की भारताच्या या अटींमुळे त्यांच्या दुग्ध उत्पादने भारतात विकली जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना मोठ्या बाजारपेठेचा फटका बसतो. अमेरिकेने २०२३ मध्ये सुमारे ८.२२ अब्ज डॉलर्सच्या दुग्ध उत्पादने निर्यात केली होती, आणि भारतासारख्या देशात प्रवेश मिळवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
या वादाचा आर्थिक परिणामही मोठा असू शकतो. SBI च्या अहवालानुसार, जर भारताने अमेरिकन दूध आयात करण्यास परवानगी दिली, तर देशातील स्थानिक दुग्ध व्यवसायाला दरवर्षी ₹१.०३ लाख कोटींचं नुकसान होऊ शकतं. स्वस्त आयात झाल्यास छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते.
या संपूर्ण प्रकरणात केवळ व्यापार नव्हे, तर धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक मूल्यं आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा समतोल राखण्याचा प्रश्न आहे. भारताने अमेरिकेला स्पष्ट संदेश दिला आहे — “मांसाहारी दूध चालणार नाही”. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की दोन्ही देश या वादातून काही समतोल मार्ग शोधतात का, की हा मुद्दा दीर्घकाळ व्यापार अडथळा ठरतो.
SL/ML/SL