परकीय चलन साठ्यात ९ अब्ज डाॅलरची वाढ
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या उत्तम क्रयशक्तीचे आणि आर्थिक सुबत्तेचे द्योतक मानला जाणारा महत्तपूर्ण आर्थिक घटक म्हणजे परकीय चलन. देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ झाली आहे. भारताचा परकीय चलन साठा 15 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात 9.11 अब्ज डॉलरने वाढून 615.97 अब्ज डॉलर झाला आहे. मागील आठवड्यात हा साठा 606.85 अब्ज डॉलर होता.
रिझर्व्ह बँकेने शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 रोजी परकीय चलनाच्या साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, परकीय गुंतवणुकीतील वाढीमुळे परकीय चलन साठा वाढला आहे. 15 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 9.11 अब्जने वाढून 615.97 अब्ज डाॅलरवर गेला. या कालावधीत परकीय चलनाच्या मालमत्तेत वाढ झाली असून ती 8.34 अब्ज डॉलर्सनी वाढून 545.04 अब्ज डॉलर झाली आहे.
त्याचबरोबर RBI च्या सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. आरबीआयचा सोन्याचा साठा 446 दशलक्ष डॉलरने वाढून 47.57 अब्ज डाॅलर झाला आहे. एसडीआर 135 दशलक्ष डॉलरने वाढून 18.32 अब्ज डॉलरने झाला. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील राखीव साठा 181 दशलक्ष डॉलरने वाढून 5.02 अब्ज डॉलरने झाला आहे.
परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ न करण्याच्या निर्णयानंतर आणि 2024 मध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर देशात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.
SL/KA/SL
23 Dec. 2023