कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांच्या कोठडीत वाढ
मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थाकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला दिलेल्या सहा कर्ज वाटपात अनियमितता आढळल्यानं साल 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी कोचर दाम्पत्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे.
या कर्जांमुळे बँकेचे 1 हजार 875 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सीबीआयचा दावा आहे. चंदा कोचर यांनी वैयक्तिक हितासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग करून व्हिडीओकॉनला 3 हजार 259 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. धूत व चंदा कोचर यांचे पती दीपक यांनी एकत्र येऊन न्यूपॉवर रिन्यूएबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं होतं.
याशिवाय व्हिडीओकॉन समूहाच्या पाच कंपन्यांच्या नावावर 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं होते. यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच 2 हजार 810 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आलेली नाही, असाही सीबीआयनं आरोप केला आहे. याप्रकरणी सोमवारी व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली असून तिन्ही आरोपींना 28 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती.
आज कोठडी मुदत संपत असल्यानं तिनही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आज तिघांनाही दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
SW/KA/SL
28 Dec. 2022