राज्यातील गारव्यात वाढ
मुंबई,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वातावरणातील कोरडेपणात वाढ झाल्याने रात्रीच्यावेळी तापमानात घट होऊन गारवा वाढतो आहे. राज्यात पुढील चार दिवस अशीच परिस्थिती राहणार असून पुन्हा तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या गारठा वाढला असून हवामान कोरडे झाले आहे. मागील काही दिवसांपासून थंडी ही वाढली आहे. रात्रीचे तापमान बऱ्याच प्रमाणात कमी होते. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्याचे तापमान हे 12 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले होते.
मुंबई शहर वगळता राज्याच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली आहे. त्यामुळे रात्री गारवा आहे. मुंबईतील तापमान सरासरीच्या बरोबरीत आहे. गुरुवारी (१७ नोव्हेंबर) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औरंगाबाद १२.५, महाबळेश्वर १२.८, पुणे १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. सोलापूर, सातारा, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा आदी भागांतही सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारवा जाणवतो आहे.
SL/KA/SL
18 Nov. 2022