BBC च्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची धाड
नवी दिल्ली ,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात दंगलीबाबत आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी BBC ने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीवरून निर्माण झालेलं वादंग शमतो न शमतो तोच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली येथील बीबीसीच्या मुख्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या वतीने धाड टाकली आहे. आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयाची झाडा झडती घेत आहेत. नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच अकाउंड ऑफिसमध्ये ठेवलेल्या कंप्यूटरचा डेटाही खंगाळण्यात येत आहे. दिल्लीतील कार्यालयातून कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. दरम्यान हा छापानसुन सर्वेक्षण असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईतील कार्यालयावरही छापा
दिल्लीसोबतच मुंबई बीकेसी येथील बीबीसी कार्यालयातही IT चं धाडसत्र सुरु झालं आहे. या कार्यालयात बाहेरील व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली नाही. सिक्योरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ITची टीम येथे आली असून, त्यांची कारवाई सुरू आहे. मुंबईतील बीकेसीच्या आवारात विंडसर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे. आणि त्याचवेळी ITचे कर्मचारी हजर राहून कारवाई करत आहेत.मुंबई आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेली आयकर टीम दिल्लीची आहे. सध्या आयकर पथकाने बीबीसी कार्यालयात शोध सुरू केली आहे. सध्या बीबीसी कार्यालयात कोणालाही जाण्याची परवानगी नाही.
कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंची टिका
या कारवाईनंतर देशात एकच खळबळ उडाली असून काँग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई म्हणजे अघोषित आणीबाणी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, याच कारवाईवर भाजपाने प्रतिक्रिया दिली असून बीबीसी तसेच काँग्रेसवर टीका केली आहे.
बीबीसी कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारीवरून शिवसेना पक्षप्रमुख , माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘बीबीसी’च्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लोबोल केला.
“इंदिरा गांधी यांनीदेखील बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवण काँग्रेसने ठेवली पाहिजे. भारतात प्रत्येक संस्थेला कायद्याचे पालन करून काम करण्याची संधी दिली जाते. मात्र त्यासाठी त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा. काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी तसेच दहशतवाद्यांच्या बाजूने का उभा राहतो,” अशी टीका भाजपाने केली. तसेच काँग्रेस प्राप्तिकर विभागाकडून केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाची वाट का पाहात नाही. काँग्रेस आताच निष्कर्षापर्यंत का पोहोचत आहे? असे सवालही भाजपाने केले.
SL/KA/SL
14 Feb. 2023