हिंदुजा ग्रुपवर आयकर विभागाची कारवाई
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील खासगी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या कर चुकवेगिरी विरोधात आयकर विभाग कडवी नजर ठेवून आहे. देशातील अनेक क्षेत्रात मोठा वाटा असलेला हिंदुजा समूह आयकर विभागाच्या निशाण्यावर आला आहे. बँकिंग आणि वित्त क्षेत्राव्यतिरिक्त, समूह आता टेक, डिजिटल आणि फिनटेक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. हिंदुजा समूह युरोप, आशिया, मध्य पूर्व आणि अमेरिकेत पसरलेला आहे.आयकर विभागाने मुंबईसह अनेक शहरांमध्ये या ग्रुपच्या ठिकाणांवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. कर चुकवल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, करचोरी प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून, मुंबईसह अनेक शहरांमध्ये असलेल्या हिंदुजा ग्रुपच्या जागेवर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. जनरल अँटी अवॉयडन्स रुल्स (GAAR) अंतर्गत करचुकवेगिरीच्या तपासासंदर्भात ही शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हिंदुजा समूहामध्ये इंडसइंड बँक, हिंदुजा लेलँड फायनान्स, हिंदुजा बँक (स्वित्झर्लंड), अशोक लेलँड, अशोक लेलँड फाउंड्रीज किंवा हिंदुजा फाउंडरीज, स्विच मोबिलिटी, पीडी हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, हिंदुजा टेक लिमिटेड, आणि हिंदुजा रियालिटी व्हेंचर्स लिमिटेड यांचा समावेश आहे.
आतापर्यंत हिंदुजा समूहाकडून आयटी छाप्याशी संबंधित कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
SL/KA/SL
29 Nov. 2023