९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

 ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

जळगाव, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. प्रताप हायस्कूलमध्ये सानेगुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री पवार यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा , स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, निमंत्रक तथा मदत , पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक अशोक जैन, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डाॅ. अविनाश जोशी, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, समन्वयक नरेंद्र पाठक, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, अमळनेर मध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी जगात पोहचल्या आहेत. विप्रो कंपनी, तत्वज्ञान केंद्राचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. बहिणाबाईंनी अतिशय सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. राज्यात वाचनसंस्कृती वाढावी. यासाठी आम्ही शासनपातळीवर प्रयत्नशील आहे. डिजिटल युगात वाचन संस्कृती बदलली आहे. वाचनसंस्कृती टिकून राहणे. ही समाजाची गरज आहे. मराठी साहित्य संमेलनास आता डिजिटल टच देण्यात आला आहे. सामाजिक सुधारणांच्या चळवळीत साहित्य, लेखक व कलाकारांचे अमूल्य योगदान आहे. राज्याच्या विकासासाठी साहित्यिकांनी व्यक्त झाले पाहिजेत. त्यांच्या सूचनांचा निश्चितच स्विकार केला जाईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृतीचे जतन होत असते. असेही त्यांनी सांगितले.

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे.‌ तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी‌ शासनाची आहे तसी आपल्या सर्वांची आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

संमेलनाध्यक्ष शोभणे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा, लेखक, धर्म, संस्कृती, परंपरा आणि आजच्या तरूणाईचे प्रश्न याविषयी मत मांडले. ते म्हणाले की, मराठी साहित्य तसेच भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटक, संस्थांची जबाबदारी आहे. प्रसार माध्यमांनी ही मराठी भाषा तसेच व्यवहाराला अग्रक्रम देण्याची गरज आहे. अभिरूची वाढविणारे दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी दृकश्राव्य वाहिन्यांवरील निर्मात्यांची आहे. तसे वृत्तपत्रांतून दर्जदार मजकूर देण्याचं काम संपादकांचे आहे. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठी साहित्य जगताचा विचार करतांना नव्या पिढीकडून आशा पल्लवित होत आहेत. आपल्या अनुभवांना वेगवेगळ्या आकृतिबंधात मांडत आपला शोध घेणारी म्हणून नवी पिढी आज काही लक्षवेधी लेखन करीत आहे. भारतीय लोकशाहीतील आधारस्तंभ असलेल्या संसद राज्य विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात साहित्य, कलावंतांची त्यांच्या राखीव जागेवर वेळोवेळी निवड होणे गरजेचे आहे. अशी‌ अपेक्षाही साहित्य संमेलनाध्यक्ष शोभणे यांनी व्यक्त केली.

ML/KA/SL

2 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *