या विद्यापीठात मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी
चंदीगड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिकपाळीच्या काळात मुलींना आणि महिलांना शाळा, कॉलेज आणि जॉबला सुट्टी मिळावी का ? या विषयावर देशात सर्वत्र चर्चा सुरु आहे. यासंदर्भात ठोस भूमिका घेत चंदीगडमधील पंजाब युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. युनिव्हर्सिटीने मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब युनिव्हर्सिटीच्या या निर्णयाचे विद्यार्थिनिंनी स्वागत केले आहे. याबाबतची माहिती देणारे परिपत्रक युनिव्हर्सिटीद्वारे जारी करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी युनिव्हर्सिटीने याबाबत काही अटी देखील घातल्या आहेत. पंजाब युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी सांगितले की, ‘आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यार्थिनींना अटी व शर्थीसह सुट्टी दिली जाईल. पण ही सुट्टी फक्त एका दिवसासाठी दिली जाईल. सुट्टी घेण्यासाठी विद्यार्थिनींना आधी विभागीय कार्यालयात उपलब्ध असलेला फॉर्म भरावा लागेल. फॉर्म दाखल केल्यानंतर विद्यार्थिनीला सुट्टीसाठी परवानगी मिळेल.
म्हणजे पंजाब युनिव्हर्सिटीत शिकणारी विद्यार्थिनी कॅलेंडरनुसार मासिक पाळी आल्यास एका महिन्यात एक दिवसाच्या सुट्टीसाठी अर्ज करू शकते. विद्यार्थिनी किमान १५ दिवस कॉलेजमध्ये आलेली असेल या अटीवरच ही सुट्टी दिली जाईल. नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला ४ दिवस सुट्टी दिली जाईल. विद्यार्थिनींना परिक्षेदरम्यान मासिक पाळीसाठी सुट्टीसाठी अर्ज दाखल करता येणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.मासिक पाळीदरम्यान सुट्टीसाठीची परवानगी युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष किंवा संचालकांकडून दिली जाईल. विद्यार्थिनींना स्व-प्रमाणपत्राच्या आधारे रजा दिली जाईल. विद्यार्थिनींना कामकाजाच्या ५ दिवसांच्या आत सुट्टीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर विद्यार्थिनींच्या सुट्ट्या आणि हजेरी तपासल्या जातील. सुट्टी ठराविक महिन्यातील फक्त एका दिवसासाठी दिली जाईल. सुट्टी कोणत्याही कारणास्तव वाढवण्यात येणार नाही, असे देखील सांगण्यात आले आहे.
दरम्यान, केरळमधील कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे देशातील पहिले विद्यापीठ आहे ज्यांनी जानेवारी २०२३ मध्ये मासिक पाळीदरम्यान सुट्टी सुरू केली. तसंच,आसामचे गुवाहाटी विद्यापीठ, NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद आणि आसामचे तेजपूर विद्यापीठ देखील मासिक पाळीदरम्यान सुट्टी देतात.
SL/ML/SL