या राज्यात आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढणार

पाटना, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष आता सज्ज झाले आहेत. मतदारांचे मन वळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करत यासंदर्भातील सविस्तर अहवाल नितीश कुमार यांनी बिहारच्या विधानसभेत मांडला आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी विविध प्रक्रीया पार पाडाव्या लागणार आहेत. मात्र नितिश कुमार यांनी घेतलेल्या या पवित्र्यांमुळे देशभर चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा आरक्षणासंबंधीच्या आंदोलनाला यामुळे बळ मिळेल अशी चर्चाही सुरु आहे.
नितीश कुमार यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर विधानसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आरक्षणाची व्याप्ती ५० वरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणाचा समावेश करून ७५ टक्क्यांपर्यंत मर्यादा वाढवली जाऊ शकते यावर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावानुसार सध्या एससीसाठी असलेल्या १६ आरक्षणाची मर्यादा २० टक्के केली जाईल. एसटीचे आरक्षण १ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत वाढेल. तर ईबीसी आणि ओबीसी मिळून ४३ टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते.
महाराष्ट्रात सध्या मराठा हा कुणबीच आहे, त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नसल्यामुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मराठा समाज आणि राज्य सरकामध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातच नितीश कुमार यांनी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान बिहारच्या नितीश कुमार सरकारनं ऑक्टोबरमध्ये जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर होती. देशात पहिल्यांदाच राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना करण्यात आली.हे करण्यामागचा नितिश कुमार यांचा राजकीय डावपेच आज त्यांनी मांडलेल्या आरक्षण मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाने उघड झाला आहे.
SL/KA/SL
7 Nov. 2023