सांगलीत दमदार पावसाला पुन्हा सुरुवात, सात हजार जण स्थलांतरित…
सांगली दि २९– जिल्ह्यात आजसकाळ पासून दमदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे, कृष्णा, वारणा परिसरातील पाणी पातळी टिकून आहे, सांगली, मिरजेतील सुमारे सात हजार लोक मदत छावण्यामध्ये आहेत. त्यात शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील काही लोकांचा समावेश आहे. या लोकांना अन्नपाणी आणि आरोग्य सुविधा जागेवरच दिल्या जात आहेत.
पुराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळमार्गे कर्नाटकात पुढे सरकत आहे. अनेकजण स्थलांतराच्या तयारीत आहेत. त्याचवेळी पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. यामुळे महापुरात कुठे राहायचे हा प्रश्न अनेक कुटुंबासमोर उभा आहे. ओढे नाले पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.
अनेक कुटुंबे आपले राहते घर सोडून अन्यत्र राहायला जाण्यास तयार नाहीत अशावेळी जिल्हा आणि महापालिका प्रशासनावर दबाव येत आहे. नदी पात्रातील पाणी ओसंडून वाहत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे पंप महापुरात बुडाल्यामुळे शहरी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मिरज शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला, पाण्याचे पंप उंच जागी हलवण्यात येत आहेत हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.