पुण्यात इच्छुक उमेदवाराने खाल्ला ‘एबी फॉर्म’
पुणे, दि. 31 : राज्यभर होऊ घाललेल्या पालिका निवडणूकीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेची सुरू आहे. उमेदवारीची आस लावून बसलेले कार्यकर्ते तिकीट न मिळाल्याने नाराज होत आहेत. पुण्यात अशाच एका नाराज इच्छुक उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म खाल्ला आहे. धनकवडी-सहकारनगर परिसरात ही नाट्यमग घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३६ (अ) मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन दावेदारांमध्ये उमेदवारीवरून वाद इतका टोकाला गेला की, एका इच्छुक उमेदवाराने प्रतिस्पर्ध्याचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ हिसकावून तो चक्क खाऊन गिळून टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग ३६ (अ) साठी पक्षाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने पेच निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे यांच्यात यावरून जोरदार वादावादी झाली. संतापलेल्या उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या हातातील पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म खेचला आणि तो फाडून थेट तोंडात टाकून गिळून टाकला.