मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी व्यूहरचना

 मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी व्यूहरचना

नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभाराचे ऑडिट करण्याची आणि त्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा काल मध्यरात्रीनंतर सरकारने विधानसभेत केली. यामुळे आजवर सत्तेत असलेल्या शिवसेना (ठाकरे गटाला) अडचणीत आणण्याची व्यूहरचना सरकारने आखली आहे.

हे ऑडिट करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली. या समितीमध्ये नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि अर्थविभाग (ऑडीट)चे संचालक यांचा समावेश आहे.

योगेश सागर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबई महापालिकेतील कारभाराचे ऑडीट करण्याची मागणी केली होती. त्याला सामंत यांनी मध्यरात्री उशीरा उत्तर दिले. हा ऑडीट अहवाल पुढील अधिवेशनात सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती काय आहे,तिथे व्यवहार कशा पद्धतीने झाले यासंदर्भातील चौकशी करून त्याचा अहवाल तयार केला जाईल, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. In Mumbai Municipal Corporation A strategy to trouble the Thackeray group

याआधी मुंबई महानगरपालिकेत ८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मारले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी हा फक्त ट्रेलर असल्याचे सांगत खरा पिक्चर बाकी असल्याचे म्हटले होते, त्याचाच हा पुढील भाग असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात आज होती.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी ही घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे त्यांच्यामागे अधिक चौकशांचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता आहे.

ML/KA/PGB
12 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *