कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चुरस
बंगळुरू, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला धुळ चारल्यानंतर आता कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्थीची चुरस सुरू आहे.
कर्नाटकात आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री ठरणार आहे. यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे बंगळुरूला रवाना झाले आहेत.
आज दुपारी सुशिलकुमार शिंदे हे तातडीने बंगळुरूला रवाना झाले आहेत. याबाबत सोलापुरातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सुशीलकुमार शिंदे बेंगळुरूला गेल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने पक्षनिरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे हे बेंगळुरूमध्ये मुक्काम ठोकणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची मोठी जबाबदारी शिंदे आणि त्यांच्या दोन जोडीदारांवर टाकण्यात आलेली आहे. सोलापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांनी तातडीने बंगळुरू गाठले आहे. शिंदे यांना त्वरित बंगळुरूकडे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाने खास चार्टर्ड विमान पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
SL/KA/SL
14 May 2023