महामुंबई शिक्षण संस्थेच्या वतीने शैक्षणिक समस्यांबाबत सखोल चर्चा
मुंबई प्रतिनिधी : मुंबई व ठाणे (MMR क्षेत्र) महानगर आणि राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेच्या विद्यमाने चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर, अंधेरी येथे महत्त्वपूर्ण सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सदानंद रावराणे होते व स्वागताध्यक्ष म्हणून अजय कौल होते. प्रारंभी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे कार्यवाह डॉ. विनय राऊत यांनी प्रास्ताविक करताना, मुंबई, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील सुमारे १० संघटनांचे ९० पदाधिकारी उपस्थित असून या संघटनांद्वारे ८५०० शैक्षणिक संस्था व २ लाखांहून अधिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व होत असल्याची माहिती दिली. सभेमध्ये आरटीई अंतर्गत शिक्षण शुल्क परतावा, अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया, वेतनेतर अनुदान, वीज दर, शाळांची नियमावली, तसेच शाळांच्या आर्थिक अडचणी यांसारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. आरटीई अंतर्गत सुमारे ३२०० कोटी रुपयांची थकबाकी असून त्याच्या तुलनेत अत्यल्प निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. याशिवाय पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमधील अडचणी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी बस भाडे सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी, तसेच म्हाडा प्राधिकरणाकडून वाढवण्यात आलेल्या भाडेपट्टीमुळे शाळांवर येणारा आर्थिक ताण यांसारखे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या सर्व समस्यांवर आमदार अमित साटम यांनी सकारात्मक भूमिका घेत, ही बैठक पूर्णतः विद्यार्थी-केंद्रित असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी संबंधित मुद्द्यांवर वस्तुस्थितीदर्शक माहितीचा संक्षिप्त अहवाल (Fact Sheet) तयार करून १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील एका महिन्यात महानगरपालिका व राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. सभेच्या अध्यक्षीय भाषणात सदानंद रावराणे यांनी सर्व संघटनांनी एकत्रितपणे काम करून वेळेत ठोस प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.