बीडमध्ये आता भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रंगला शाब्दिक संघर्ष

मुंबई दि ८:– मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते, असा खळबळजनक दावा मिटकरी यांनी केला आहे.
धस यांचा सीडीआर काढला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे बीडमध्ये सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्ष पेटल्याचे बघायला मिळत आहे. आमदार धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून सुरेश धस हेच इतिहासातील “आका” आहेत, असा गंभीर आरोप मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
धस यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांचे पुरावे योग्यवेळी बाहेर काढणार असून पाथर्डी तालुक्यातील एका गावात जानेवारी २००१ मध्ये झालेल्या दरोड्यातील म्होरक्याचे संबंध कोणासोबत होते, हेही समोर आणणार असल्याचे त्यांनी म्हटले.
ते म्हणाले की, दरोडा टाकणाऱ्या दारासिंग उर्फ मारुती भोसले गँगमधील दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ असे टी शर्ट होते. ही भोसले गँग माझ्यासाठी कोणाचाही काटा काढू शकते, असे सांगणारा नेता कोण ? हे सगळ्यांनाच माहिती असल्याचा दावा मिटकरी यांनी केला. बीड शहराचे वासेपूर करणारे धस यांनी आष्टी, पाटोद्यात हुकूमत तयार केली होती. इतिहासात तेच आका होते.
निवडणूक निकालानंतर पालकमंत्रीपद, मिळेल असे धस यांना वाटले होते, पण ते मिळत नसल्याचे पाहून धनंजय मुंडे यांचा काटा काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. 8 हिंदू 2 मुस्लिम देवस्थानांची 1421 कोटींची 485 एकर जमीन कोणी हडप केली, हे बीडकरांना माहिती आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करताना किती निष्पापांचे मुडदे आष्टीतील बंगल्यात गाडले गेले, त्याला विरोध करणाऱ्या राम खाडेसारख्या तरुणांचे किती हाल केले, याचीही सर्वांना माहिती असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सुरेश धस हेच उचकावत आहेत. धस यांना वरिष्ठांनी सांगूनही त्यांची भाषा सुधारत नसेल तर त्यांचा बोलविता धनी कोण ? हेही शोधावे लागेल. जर सुरेश धस यांच्या जीभेचा पट्टा थांबला नाही तर आम्हीही अनेक प्रकरणे बाहेर काढू, असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे.
लक्ष्मण हाके यांनीही लावले आरोप
दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आमदार सुरेश धस यांच्यावर हल्ला चढविला आहे. धस यांनी प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन महाराष्ट्र आणि देशभरातील देवस्थानाची जमीन हडपली. शंभू महादेवाच्या देवस्थानाचा फ्रॉड केला, असा गंभीर आरोप हाके यांनी केला आहे. सत्तेत असलेल्या मंत्र्यावर एसीबीची धाड पडून त्यांच्या पीएकडे घबाड सापडलेले सुरेश धस हे देशातील एकमेव नेते आहेत. जरांगे आणि धस यांच्यात कोल्डवार सुरू असल्याचेही हाके यांनी म्हटले आहे.