भीषण अपघातात लोखंडी सळ्या अंगात घुसून आठ तरुणांचा मृत्यू…
नाशिक, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून पिकअप (छोटाहत्ती) ने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकमधील सळया तरुणांच्या शरीरातून आरपार गेल्याने या भीषण अपघातातील मृतांचा आकडा ८ वर गेला आहे.
नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपूलावर आयशर ट्रक आणि मालवाहतूक करणाऱ्या पिकअप (छोटा हत्ती) मध्ये भाविकांच्या वाहनाला काल रात्री ८ वाजता हा भीषण अपघात झाला.
नाशिक शहरातील सिडको येथील २० ते २५ रहिवाशी निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. धार्मिक कार्यक्रम आटपून घरी परत असताना या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात घडला. पिकप चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती जोरदार वेगाने आयशर ट्रक वर मागून धडकली यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात जागीच पाच जण ठार झाले असून, रुग्णालयात उपचारादरम्यान इतर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक रात्री उशिरापर्यंत चार ते पाच तास विस्कळीत झाली होती. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून, रुग्णालयात उपचारादरम्यान इतर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी चारुदत्त शिंदे यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांनी अपघात स्थळाची पाहणी करुन जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली, अपघातातील मृतांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर तर जखमींना उपचारासाठी पूर्ण मदत करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ₹५ लाख आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
ML/ML/SL
13 Jan. 2025