100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत RBI कडून महत्त्वाचे निर्देश

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने ATM मशीनमधून ₹100 आणि ₹200 च्या नोटा सहज उपलब्ध करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RBIने जारी केलेल्या निर्देशांनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशभरातील 75% ATMमध्ये किमान एक कॅसेटमधून ₹100 किंवा ₹200 च्या नोटा काढता येणे अनिवार्य असेल. पुढील टप्प्यात, 31 मार्च 2026 पर्यंत 90% ATMमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. व्हाईट लेबल ATM हा प्रकारही यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. ही ATM खासगी किंवा बिगर आर्थिक संस्थांकडून चालवली जातात आणि सरकारी किंवा खासगी बँकांच्या ATMसारख्या सुविधांद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून व्यवहार करण्याची सुविधा देतात.
RBI च्या निर्णयामुळे सामान्य जनतेसाठी व्यवहार अधिक सुलभ होईल, कमी मूल्याच्या नोटा सहज उपलब्ध होतील आणि आर्थिक अडचणी दूर होतील. मात्र, बँकांनी वेळेत सर्व व्यवस्था पूर्ण करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना या निर्णयाचा सरळ फायदा मिळेल.