रायपाटण येथे सापडला शिवकालीन अनमोल ठेवा

राजापूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यातून, या शिवकालीन पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदीर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा दृष्टिक्षेपात आल्याने येथील शिवकालीन इतिहास आता पुन्हा उलगडण्यास मदत झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशनि पावन झालेल्या या पायवाटेवरील आणि अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर असलेला हा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा पाहताना या ठिकाणावरून कोकण परिसर, अर्जुना धरणप्रकल्प अन् निसर्गसौदर्य अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. मात्र, या शिवकालीन पायवाटेसह या मार्गावरील ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी शासनाने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि इतिहासप्रेंमींकडून करण्यात येत आहे.
घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणाऱ्या अनेक पायवाटा आहेत. मात्र, कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यापैकी एक असलेली तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा ऐतिहासिक शिवकालीन पायवाट आहे. पाचत पेरडवमार्गे अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर जात मुख्य घाटमार्गाला जोडली जाणारी सुमारे तीन-चार किमी. च्या या पायवाटेचा प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसलेल्या काळखंडामध्ये कोकणातून घाट परिसरामध्ये जा-ये करण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून उपयोग केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
SL/ML/SL
27 Dec. 2024