दहावी, बारावीच्या परीक्षेच्या वेळेबाबत महत्त्वाचा निर्णय
मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळाबाबत नुकतेच कडक नियम लागू केले आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग चिंतेत पडला आहे.
आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीवरुन दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. परीक्षांच्या वेळाबाबत नव्याने करण्यात आलेल्या बदलांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे आहेत नवीन बदल
- आता वर्गात एकदा प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या की त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. याआधी परीक्षा सुरू झाल्यावर अर्धातास उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जात असे.
- विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेच्या अर्धातास आधी परीक्षा केंद्रांवर हजर राहणे बंधनकारक.
- विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेतच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. याआधी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जात होती.
- कॉपी केल्यास काय शिक्षा होणार याचे धडे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधीच द्यायचे आहेत. तसेच याबाबच्या सुचना हॉल तिकीटच्या मागे देखील छापण्यात येणार आहेत.
- परीक्षेच्या वेळी इतर विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यास, शेजारच्याचे उत्तर पाहून लिहिल्यास, तोंडी उत्तर सांगितल्यासही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- उत्तरपत्रिकेत प्रक्षोभक भाषेचा वापर, शिवीगाळ, धमकी इत्यादी स्वरूपात लेखन केल्यास कारवाई करण्यात येईल
- उत्तरपत्रिकेत सिनेमाची गाणी, डायलॉग, गोष्ट लिहिल्यास देखील कारवाई करण्यात येणार आहे.
सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भातील सुधारित वेळा देखील जाहिर करण्यात आल्या आहेत.
ML/KA/SL
15 Feb. 2023