सरकारी विमानं, हेलिकॉप्टर्सबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई, दि. ३० : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. या अपघाताची चौकशी आता CID कडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर आता सावधगिरीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सरकारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स बद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या संदर्भात निधी मंजूर केला आहे. याबद्दलचा जीआरदेखील काढण्यात आला आहे.
हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं खर्चाला मंजुरी दिली आहे. प्रत्येकी ३ कोटींच्या २ पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ६ कोटींची मागणी करण्यात आली होती. या पैशांमधून लहान बांधकामं केली जातील. सोबतच यंत्रसामु्ग्री, साधन सामग्रीची खरेदी केली जाईल.
सरकारी हवाई वाहनांची देखभाल, दुरुस्ती वेळेत व्हावी, या हेतूनं ६ कोटी रुपयांच्या खर्चाला अर्थ विभागानं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता सरकारच्या हवाई ताफ्यातील वाहनांच्या अत्यावश्यक कामांना गती मिळणार आहे. विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या देखभाल, दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेला ६ कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष वितरीत केला जाणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या प्रस्तावावर अर्थ विभागानं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
SL/ML/SL