10वी, 12 वी परीक्षांबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये, तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. हा बदल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी 7 जानेवारी रोजी सर्व बाह्य परीक्षकांसाठी एक विशेष उद्बोधन वर्ग आयोजित केला जाणार आहे. या वर्गात परीक्षकांना प्रात्यक्षिकांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तपासायच्या, गुण कसे द्यायचे, नियम काय आहेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. यामुळे परीक्षा अधिक एकसमान आणि न्याय्य होईल.
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होतील, तर त्यानंतर 10 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होतील. दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होतील. विद्यार्थ्यांनी या तारखा लक्षात ठेवून तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत कॉपी किंवा इतर अनियमितता पूर्णपणे थांबवाव्यात, असा यामागे बोर्डाचा हेतू आहे. यापूर्वी काही केंद्रांवर असे प्रकार आढळले होते. त्यामुळे आता बाह्य परीक्षकांची सरमिसळ करून विश्वासार्हता वाढवली जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना खरे गुण मिळतील आणि परीक्षा प्रक्रिया स्वच्छ राहील.
प्रत्येक जिल्ह्यातील किमान 10 टक्के शाळांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा चालू असताना शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांची विशेष पथके थेट भेटी देऊन तपासणी करतील. ही पथके प्रात्यक्षिके कशी घेतली जात आहेत?, तोंडी परीक्षा योग्य चालली आहे का?, याची खात्री करतील. परीक्षेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी हा उपाय आहे.