वानरांचा आवाज काढणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी
नवी दिल्ली, दि. ५ : दिल्ली विधानसभा परिसरात माकडांचा उपद्रव इतका वाढला आहे की प्रशासनाला आता वानर-व्यवस्थापन विभाग सुरू करावा लागला आहे! रोजच्या रोज माकडांची घुसखोरी, कागदं उडवणे, पिशव्या हिसकावणे आणि आमदारांच्या चहावर डल्ला मारणे – या सगळ्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत. अखेर उपाय म्हणून त्यांनी एक भन्नाट योजना आखली आहे.
आता विधानसभा परिसरात खास वानर आवाज तज्ज्ञ तैनात केले जाणार आहेत. हे कर्मचारी आठ-आठ तासांच्या शिफ्टमध्ये बसून माकडांसारखे असा आवाज काढून माकडांना पळवतील. म्हणजेच, माकडांना घाबरवण्यासाठी माणसांनीच माकड बनायचे! PWD ने यासाठी बाकायदा निविदा काढली आहे – म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आता “वानर आवाज” हा कौशल्याचा विषय ठरणार आहे.
योजनेत अजून एक ट्विस्ट आहे – या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांसोबत खरेखुरे वानरही आणले जाणार आहेत. म्हणजे माकडांना सांगता येईल, “भाई, इथे आधीच आमचा वानर आहे, तुम्ही दुसरीकडे जा!” प्रशासनाला वाटते की हा उपाय माकडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी ठरेल.
थोडक्यात, दिल्ली विधानसभा परिसर आता वानर वॉर झोन बनला आहे. माकडं घुसली तर आवाज काढणारे माणसं आणि खरे वानर मिळून त्यांना हाकलतील. नागरिक आणि कर्मचारी सुरक्षित राहतील, पण परिसरात रोज नवा गंमतशीर नक्कीच पाहायला मिळेल – “माकड विरुद्ध माणूस-माकड”!
SL/ML/SL