भारताच्या विकासदराबाबत IMF चा सावध इशारा

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक प्रगतीशील अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होत असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकासाबाबत एक सावध इशारा दिला आहे. २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर २० आधार बिंदूंनी कमी होऊन ५.९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा धोक्याचा इशारा देणारा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी आयएमएफने विकासदर ६.१ टक्के राहण्याचे भाकीत केले होते. तथापि, खालावलेल्या या सुधारित अंदाजानंतरही भारतच जगातील सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास साधणारा देश असेल, असे आयएमएफने स्पष्ट केले आहे.
भारतानंतर चीनचा विकासवेग सर्वाधिक राहिल, असे या अहवालाची आकडेवारी दर्शविते. चीनचा विकासदर २०२३ मध्ये ५.२ टक्के आणि २०२४ मध्ये ४.५ टक्के राहण्याचा अंदाज अहवालाने वर्तविला आहे. जो २०२२ मध्ये केवळ ३ टक्के नोंदवला गेला होता.
जागतिक पातळीवर करोनाची महासाथ आणि त्यानंतर युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर, महागाईला प्रतिबंध म्हणून व्याजदर वाढीमुळे आर्थिक अरिष्ट ओढवण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतून जागतिक पातळीवर उभारीच्या दिशेने मार्गक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जागतिक अर्थवृद्धीला प्रभावित करणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेने जोरदार पुनरागमन केले आहे. पुरवठा-साखळीतील व्यत्यय कमी होत आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ पीएरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी सांगितले.
SL/KA/SL
12 April 2023