बिपरजॉय चक्रीवादळाबाबत IMD चा गंभीर इशारा, ६७ ट्रेन्स रद्द

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे. आता हे वादळ हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. याआधी चक्रीवादळाने पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल केल्याची चर्चा होती, मात्र आता त्याने आपला मार्ग बदलला आहे. त्याचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसू लागला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ १५ जून रोजी गुजरातमधील सौराष्ट्र – कच्छच्या किनारपट्टीवर धडकू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळाने तीव्र स्वरुप धारण केल्यामुळे हवेचा वेग ताशी १२५-१३५ किमी ते १५० किमीपर्यंत वाढू शकतो, असाही इशारा देण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्हा प्रशासनाने 13 जून ते 15 जून या कालावधीत किनारपट्टीजवळील लोकांच्या हालचालींवर बंदी घातली आहे. हे चक्रीवादळ 15 जूनपर्यंत गुजरातमध्ये पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सौराष्ट्र, कच्छसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, यामुळे 16 जूनपर्यंत राजस्थानच्या अनेक भागात वादळी पावसाची शक्यता आहे. जोधपूर आणि उदयपूर जिल्ह्यांत याचा अधिक परिणाम दिसून येईल.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळ प्रवण भागात खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने ६७ गाड्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेल्या चक्रीवादळांमध्ये आता बिपरजॉय वादळाचा समावेश झाला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात दि. ६ जून रोजी सकाळी ५.३० वाजता बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले. चक्रीवादळ सक्रीय होऊन सात दिवस झालेले आहेत आणि अजूनही ते किनारपट्टीला धडकलेले नाही. हे चक्रीवादळ १५ जूनला धडकणार असल्याने त्याचा एकूण कालावधी दहा दिवस होऊन ते सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ म्हणून नोंदले जाईल.
SL/KA/SL
13 June 2023