आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पवई आयआयटीध्ये एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना
आज दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आयआयटी मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दर्शन रमेशभाई सोलंकी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. दर्शन आयआयटीमध्ये बी. टेकच्या केमिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो आयआयटीतील 16 – बी नंबर वसतिगृहाच्या 802 खोलीत राहत होता. दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काही तरी पडल्याचा आवाज आल्याने एकच धावपळ झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ आयआयटीच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
दर्शन सोलंकी तीन महिन्यांपूर्वी अहमदाबादहून आयआयटी पवईत आला होता. शिवाय त्याची कालच परीक्षा झाली होती. त्यानंतर त्याने आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. परंतु, दर्शनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात कलम 174 सीआरपीसी अन्वये अपमृत्यू नोंद करण्यात आला.दरम्यान
दर्शनचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून उप नि अनिल कांबळे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
SW/KL/KA
13 Feb. 2023