मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी IAS अधिकारी अश्विनी भिडे

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम सुरु झाले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून आज नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रधाव सचिव असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची त्या जागा घेतील. दरम्यान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नवीन नियुक्ती होईस्तोवर या पदाचा कार्यभार भिडे यांच्याकडेच राहणार आहे.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील नवीन टीम तयार करण्यास सुरूवात केली आहे. आयएएस अधिकारी श्रीकर परदेसी यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत भिडे या राज्यात महिला उमेदवारांमध्ये सर्वप्रथम आल्या होत्या. भिडे यांना सनदी सेवेचा एकूण २५ वर्षांचा अनुभव आहे. राज्यपालांच्या उपसचिव आणि त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)च्या अतिरिक्त महानगर आयुक्त तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.
SL/ML/SL
13 Dec. 2024