विरोधकांना योग्य न्याय देईन
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधकांच्या संख्याबळाचा विचार न करता त्यांना योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल अशी ग्वाही विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.
काल अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत केवळ राहुल नार्वेकर यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे आज त्यांची निवड ही केवळ औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार नार्वेकर यांची निवड झाल्याचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी जाहीर केले आणि त्यानंतर विरोधी पक्षासह सत्तारूढ पक्षातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नार्वेकर यांना त्यांच्या आसनापर्यंत घेऊन गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. आपल्या भाषणात फडणवीस यांनी आधीच्या अध्यक्षांचे दाखले देत नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षाच्या काळात त्यांच्यासमोर असलेल्या अत्यंत कठीण अशा पक्षबदल संदर्भातील सुनावणीच्या निकालाची प्रशंसा केली. यापुढे देखील त्यांच्याकडून योग्य पद्धतीचे काम होईल अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांना चांगलेच टोले लगावले आणि ईव्हीएम वर शंका घेणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देत अध्यक्षांची निवड ही बिनविरोध झाली याचे कारण विरोधकांची संख्या कमी झाली आहे त्यांच्याकडे बळच राहिले नाही असे शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ईव्हीएम बाबत अनेक जण अनेक आकडे देत आहेत मात्र त्यांना मी सविस्तर उत्तर नंतर देईन असे सांगत राहुल नार्वेकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षाच्या वतीने जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदींनी अभिनंदन पर भाषणे केली. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला विरोधकांशी संवाद साधण्याचा निर्धार हा अभिनंदन पात्र आहे असे यावेळी सांगितले.
ML/ML/SL
9 Dec. 2024