I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीची झाली सांगता, बघा कोण काय म्हणाले?

 I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीची झाली सांगता, बघा कोण काय म्हणाले?

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध एकवटलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या कालपासून सुरू झालेल्या बैठकीच्या आज संयुक्त पत्रकार परिषदेने सांगता झाली. या बैठकीला विविध सदस्यांचे २८ सदस्य उभे होते. या सर्व नेत्यांनी देश व संविधान वाचवण्यासाठी एकत्र आल्याचा दावा केला आहे. ही दोन दिवसिय बैठक पार पडल्यावर आज दुपारी 3.30 वा. या आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, केजरीवाल आदी नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टिकेची झोड उठवली. ममता बॅनर्जी मात्र या पत्रकार परिषदेत हजर नव्हत्या.

या व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्ष देशाच्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सांगितले. या एकजुटीमुळे भाजपचा पराभव निश्चित आहे. आता भाजपला विजय मिळणे अशक्य आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला.त्यांनी म्हटले की, मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत असताना संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले नाही. कोरोना काळात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही. आताच संसदेचे विशेष अधिवेशन कसे बोलावले? असा सवाल करताना खरगे यांनी देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोप केला.

‘आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही आणि जे चुकीच्या रस्त्यावर गेले आहेत, त्यांनाही योग्य रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करू. मात्र ते योग्य रस्त्यावर येण्यास तयार नसतील तर त्यांना बाजूला करू,’ असं म्हणत शरद पवार यांनी नामोल्लेख न करता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील बंडखोर गटाला इशारा दिला आहे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, आगामी निवडणुकीत आम्ही हुकूमशाही-जुमलेबाजीविरोधात विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. आम्ही सबका साथ, सबका विकास असे ऐकले होते. पण निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची मित्रमंडळी वाढली आणि त्यांचाच विकास झाला. आमच्या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांत घबराट पसरली आहे. आम्ही क्रोनिझमच्या विरोधात लढू. घाबरू नका, आम्ही भयमुक्त भारत घडवणार आहोत. अखेर सरकारने अचानक संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सध्या जे केंद्रात आहेत त्यांचा पराभव होईल. त्यांनी मीडियाचा ताबा घेतला आहे. त्यांच्या फक्त बातम्या प्रसिद्ध होतात. ते पराभूत होताच, प्रेस देखील मुक्त होईल. मग तुम्हाला जे वाटेल ते लिहा. त्यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे, आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही तयार आहोत, वेळेपूर्वी निवडणुकाही होऊ शकतात.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इंडिया आघाडी मोदी सरकारच्या पतनास कारणीभूत ठरेल. त्यामुळे अनेक बड्या शक्ती इंडिया आघाडी मोडून काढण्यासाठी कारस्थान करत आहेत. आमच्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्यात भांडण नाही. आम्ही सर्व एकजूट आहोत, असेही केजरीवाल यांनी म्हटले.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या बैठकीसाठी जवळपास सर्वच प्रमुख विरोधी पक्षांचे बडे नेते जमले होते. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आदींचा समावेश होता.

SL/KA/SL

1 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *