*हैदराबाद गॅझेटिअरवरील जीआरमुळे मराठा समाजाच्या न्यायप्राप्तीचा मार्ग सुकर :

मुंबई, दि २ :
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला शासन निर्णय (जीआर) आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला असून, यामुळे मराठा समाजाच्या ऐतिहासिक न्यायाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले गेले आहे. या निर्णयाबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देतांना कवाडे यांनी सांगितले की, मागील अनेक दशकांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकीय चर्चांमध्ये अडकून राहिला होता. न्यायालयीन प्रक्रिया, कायदेशीर गुंतागुंत आणि विविध पक्षांचे अपूर्ण प्रयत्न यामुळे समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाने शासनाला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले आणि अखेर हैदराबाद गॅझेटिअरमधील ऐतिहासिक नोंदींना आधार देत शासनाने जीआर प्रसिद्ध केला. या जीआरनुसार, मराठवाड्यातील मराठा समाजातील पात्र घटकांना कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. यामुळे त्यांना शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेता येईल. समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी व रोजगाराच्या संधींसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असेही जयदीप कवाडे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला न्याय मिळावा ही सर्वांचीच अपेक्षा होती. महायुती सरकारने या दिशेने टाकलेले पहिले पाऊल निश्चितच ऐतिहासिक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि शासनाने दाखविलेली संवेदनशीलता यामुळे हा निर्णय शक्य झाला आहे. या निर्णयामुळे समाजात नवा विश्वास, नवी आशा आणि आत्मभान निर्माण झाले आहे. कवाडे यांनी हेही अधोरेखित केले की, शासनाने जाहीर केलेला हा निर्णय केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण राज्याच्या सामाजिक न्याय आणि समतेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण इतिहास, दस्तऐवज आणि शासन यांचा संगम घडवून राज्य सरकारने समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याची तयारी दाखविली आहे. याप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करताना सांगितले की, फडणवीस यांनी नेहमीच सामाजिक प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा त्यांचा निर्धार या निर्णयातून स्पष्ट झाला आहे. महायुती सरकारने दाखविलेली ही बांधिलकी खऱ्या अर्थाने समाजहिताची आणि ऐतिहासिक ठरावी अशी अपेक्षा आहे असेही जयदीप कवाडे म्हणाले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.KK/ML/MS