देशातील आघाडीच्या ॲथलिट्सना रेल्वे स्टेशनवर अपमानास्पद वागणूक

 देशातील आघाडीच्या ॲथलिट्सना रेल्वे स्टेशनवर अपमानास्पद वागणूक

पनवेल, दि. २० : पनवेल रेल्वे स्थानकावर देशातील अग्रगण्य पोल व्हॉल्टपटू देव मीणा आणि कुलदीप यादव यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.** प्रवासादरम्यान तिकीट तपासनीसाने (टीटीई) पोल सोबत नेण्यास परवानगी नसल्याचे सांगितल्यामुळे दोन्ही खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून खेळाडूंनी थेट भारतीय रेल्वेला प्रश्न विचारले आहेत.

खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वारंवार स्पष्टीकरण मागितले, दंड भरण्याची तयारी दर्शवली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याची मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांना ट्रेनमधून उतरवण्यात आले. मूळ ट्रेन चुकल्यानंतर दुसऱ्या ट्रेनमधूनही त्यांना उतरवण्यात आले, ज्यामुळे पनवेल स्थानकावर जवळपास पाच तास थांबावे लागले. देव मीणाने या घटनेमुळे तरुण खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणींचे वास्तव स्पष्ट झाल्याचे सांगितले.

‘एनएनआयएस स्पोर्ट्स’च्या माहितीनुसार, ही घटना नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ नंतर घडली. देव मीणाने अनेक वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे, तर कुलदीप यादवने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत विक्रम प्रस्थापित केला. दोघेही मंगळुरूहून भोपाळकडे जात होते.

पोल व्हॉल्टसाठी लागणारे दर्जेदार पोल सुमारे दोन लाख रुपयांचे असतात. खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, ते सुरक्षितपणे सोबत नेणे आवश्यक असते. “अतिरिक्त शुल्क भरण्यास आम्ही तयार होतो, तरीही आमचे म्हणणे ऐकले गेले नाही,” असे देवने सांगितले. कुलदीप यादवनेही निराशा व्यक्त करत म्हटले की, “आम्ही देशाचे आघाडीचे खेळाडू असूनही अशी वागणूक मिळत असेल, तर आमच्या ज्युनिअर्सना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल?”

या घटनेचा व्हिडिओ एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेल्वे मंत्रालय, पंतप्रधान, क्रीडा मंत्री आणि रेल्वे मंत्र्यांना टॅग करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या. “२०३६ ऑलिम्पिक आयोजित करण्याची स्वप्ने पाहतोय, पण खेळाडूंशी अशी वागणूक?” असा सवाल नेटकऱ्यांनी केला. दरम्यान, ‘रेल्वे सेवा’ या अधिकृत खात्याने या प्रकरणाची दखल घेतली असून आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठवण्यात आल्याचे सांगितले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *