दिल्लीत मानवी रेबीज Notifiable Disease म्हणून घोषित
नवी दिल्ली, दि. ५ : न्यायालयाने वारंवार कारवाईचे आदेश देऊनही राजधानी दिल्लीतील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न अद्यापही सोडवला गेलेला नाही. कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा जीवघेणा आजार मानवी रेबीजला दिल्ली सरकारने Notifiable Disease घोषित केले असून, आता कोणतीही संशयित किंवा निश्चित केस आरोग्य विभागाला कळवणे बंधनकारक झाले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे वेळेत लक्ष ठेवता येईल आणि उपचारात विलंब होणार नाही. सर्व सरकारी-खाजगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व डॉक्टरांना त्वरित नोंद करावी लागेल. आरोग्य मंत्री पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की रेबीजमुळे होणारा एकही मृत्यू स्वीकारार्ह नाही आणि हा आदेश तात्काळ लागू झाला आहे.
दिल्ली सरकार कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी ‘स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर रेबीज एलिमिनेशन’ तयार करत आहे. MCD च्या माहितीनुसार 2025 मध्ये रेबीजचे 49 रुग्ण व कुत्र्याच्या चाव्याचे 35,198 रुग्ण नोंदवले गेले. केंद्र सरकारने 2022-24 दरम्यान मृत्यू नसल्याचे सांगितले होते, मात्र RTI नुसार या काळात 18 मृत्यू झाले. WHO च्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात 59,000 लोक रेबीजमुळे मृत्युमुखी पडतात, तर भारतात सुमारे 20,000 मृत्यू होतात. भारतातील 60% प्रकरणे 15 वर्षांखालील मुलांमध्ये आढळतात.
रेबीज हा विषाणूजन्य संसर्ग असून कुत्रा, मांजर, माकड यांच्या चाव्याने किंवा लाळेच्या संपर्काने पसरतो. हा विषाणू मेंदू व मज्जासंस्थेवर हल्ला करतो. वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यू होऊ शकतो. सुरुवातीला चावलेल्या जागी टोचणे, खाज, ताप व स्नायू दुखणे जाणवते. पुढे पाणी पाहून भीती वाटणे, वाऱ्याने घाबरणे ही प्रमुख लक्षणे दिसतात.
SL/ML/SL