*नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा

मुंबई, दि १३
नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरळी कोळीवाडा येथे शिवसेना माहिला शाखाप्रमुख पुजा बारीया यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक व विभागप्रमुख दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका रत्ना महाले, प्रवक्त्या सुशीबेन शहा यांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांची आज भेट घेतली. महिलेला मारहाण करणे ही गंभीर बाब असून या प्रकरणी अदखलपात्र तक्रार न घेता दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निवेदन देशमाने यांना शिवसेनेकडून यावेळी देण्यात आले.
वरळी कोळीवाडा येथे दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी कोळीबांधवांच्या निमंत्रणाला मान देऊन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारळी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी झाले होते, मात्र यावेळी उबाठाच्या गटाचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे तसेच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण नसताना शिवसेना महिला शाखाप्रमुख पुजा बारिया यांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या पुजा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीसांनी संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी आज शिवसेनेचे शिष्टमंडळ अप्पर पोलीस आयुक्त देशमाने यांना भेटले, अशी माहिती शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, वरळीतील उबाठाचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे याने पुजा बारिया यांना मारहाण केली. जखमी पुजा बारिया या दोन दिवस केईएम रुग्णालयात उपचार घेत होत्या. या प्रकरणी पोलीसांनी अदखलपात्र तक्रार न घेता दोषींवर एफआयआर नोंदवावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.
राज्यात रक्षा बंधनाचा उत्साह असताना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यांदेखत महिलांना मारहाण झाली. यावर आदित्य ठाकरे संबधित युवा सेना पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेणार का, असा सवाल म्हात्रे यांनी केला. एका महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्याबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, असे त्या म्हणाल्या. महिलांचा मानसन्मान ठेवत असाल तर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ सिद्धेश सुनील शिंदे याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुशीबेन शहा यांनी केली.KK/ML/MS