आरोग्य,शिक्षण,पाणी पुरवठ्याच्या मुद्दयावर बसपा निवडणूक रिंगणात!
डॉ.हुलगेश चलवादींची माहिती*

 आरोग्य,शिक्षण,पाणी पुरवठ्याच्या मुद्दयावर बसपा निवडणूक रिंगणात!डॉ.हुलगेश चलवादींची माहिती*

पुणे, दि १८

मोडकळीस आलेल्या महानगर पालिकेच्या शाळा, पाणीपुरवठा करतांना पेठा आणि उपनगर असा केला जाणारा भेदभाव आणि आरोग्य सोयीसुविधेसह सर्वसामान्यांच्या मुद्यांवर बहुजन समाज पक्ष १५ जानेवारीला होवू घातलेली पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणूक लढवेल, अशी माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.१८) दिली.

शहरात लोकसंख्येचा वाढता दबाव लक्षात घेता पालिकेने सोयीसुविधेत कुठलीही वाढ केली नाही. आतपर्यंतच्या अकार्यक्षम राजकीय नेतृत्वाचा फटका त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना बसतोय. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून बसपा सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले गेले. पंरतु, पेठांमध्ये अखंडित आणि उपनगरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. कर सर्वांकडून समान भरला जात असतांना असा भेदभाव का केला जातो? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला. बसपाला मतदारांनी कौल दिला तर हा भेदभाव मोडून काढू, असे ते म्हणाले. पेठांमध्ये चांगले उद्यान; सर्व सोयीसुविधा, परंतु, उपनगरांमध्ये या सोयीसुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी मनपाच्या एकूण अर्थसंकल्पात ५% निधी राखीव ठेवला जातो. पंरतु, या निधीचा वापर आजपर्यंत योग्यरीत्या झाला नाही.पालिकेच्या १६ हजार कोटींच्या बजेटपैकी ७०० ते ८०० कोटींचा निधी घटनेनूसार मागासवर्गीयांना सुविधा पुरवण्यासाठी वापरण्यात यावा, याकडे बसपाचा कल आहे. हा निधी गोरगरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, सायकल, संगणक, लॅपटॉप तसेच इतर शैक्षणिक शुल्कासाठी वापरता येईल, असे डॉ.चलवादी म्हणाले.
शिवाय शहरातील वाहतूक खोळंबा टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन, झोपडपट्टीवासियांना सन्मानपुर्वक एसआरए योजनेत समाविष्ट करण्यासह ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हरित पुणे’ साठी पक्ष कटिबद्ध असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

महापालिकेच्या शाळांचा दर्जा निकृष्ठ झाला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असतांना शाळांची अशी स्थिती शहराला शोभनीय नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता असलेली शाळा पालिकेने उभारावी, प्रत्येक वॉर्ड मध्ये वाचनालय , सर्व सोयीसुविधायुक्त उद्यानांची निर्मितीसाठी बसपाला कौल देण्याचे आवाहन डॉ.चलवादींनी केले. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर जलतरंग तलाव साचतात. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असतांना ते केले जात नाही. बसपा या दिशेने देखील काम करेल, असे डॉ.चलवादी म्हणाले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *