अजून किती ललित पाटील समाजात मोकाट
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या ससूनमधील ड्रग रॅकेटचा मुख्य आरोपी ललीत पाटील याच्या मागे महायुतीमधील कोणाचा आशिर्वाद आहे, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, असे अजून किती ललीत महाराष्ट्रात मोकाट आहेत, असे प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. या संपूर्ण प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
त्याचबरोबर सरकार ओबीसींच्या तोंडाला पाने पुसत असून ओबीसींच्या बैठकीचे सरकारचे इतिवृत्त फसवे आहे. या सरकारला विमा कंपन्या जुमानत नाहीत. पीक विम्याच्या अग्रीम ऐवजी संपूर्ण भरपाई का नाही याचेही उत्तर सरकारने द्यावे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले आहे.
आज विधान भवन येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरकारी दवाखान्यात ड्रगचा धंदा हे महाराष्ट्राचे दुर्दैव
वडेट्टीवार म्हणाले, ललीत पाटील धुळे, चाळीसगाव फिरून कर्नाटक मध्ये गेला. त्यानंतर चेन्नई येथे त्याला मुंबई पोलीसांनी अटक केली. त्यामुळे पुणे पोलीस काय करत होते हा प्रश्न आहे. ललित पाटीलला पकडले म्हणजे प्रकरण मिटले, असे होत नाही. त्याला कोणाची फूस होती, त्याला कोणी पळवले याची चौकशी झाली पाहिजे. एकीकडे रूग्णालयात ड्रगचा धंदा केला जातो. दुसरीकडे रूग्णांना औषध मिळत नाही. हे सरकारचे अपयश आहे. सरकारी दवाखान्यात ड्रगचा धंदा होतो. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून पुण्याच्या ससून रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य जनतेसमोर आले पाहिजे.
सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय ललित पाटील पळून जाऊ शकत नाही. सरकार फक्त टेंडर काढण्यात व्यस्त असून सरकारला मलिदा खाण्याशिवाय उद्योग राहिला नाही. त्यामुळे असे अनेक ललित राज्यात मोकाट फिरत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यंत आहेत. याचा छडा सरकारने लावला पाहिजे. यासाठी विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरकारने ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली
वडेट्टीवार म्हणाले, नागपूर येथे ओबीसींच्या विविध संघटनांची बैठक झाल्यानंतर सरकार हादरले. त्यानंतर सरकारने घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर करण्यात आले. हे इतिवृत्त फसवे असून सरकार ओबीसींच्या तोंडाल पाने पुसत आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी आम्ही सातत्याने करतो आहे. राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी देखील ही भूमीका मांडली आहे. त्यावर सरकार अनुकूल असल्याचे सांगत ओबीसींची फसवणूक करत आहे.
वर्ष संपत आले तरी मुलांना वसतीगृह नाही. ओबीसींच्या महामंडळाला निधी देताना दुजाभाव केला जात आहे. हा निधी का कमी दिला जातो याचे स्पष्टीकरण सरकारमधील ओबीसी नेत्यांनी द्याव. कर्ज घेतलेल्यांना नोटीसा देऊन त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींसाठी घरकुल योजनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजाणी महायुती सरकार करत नाही. वसतिगृहाचा विषय आला की, अर्थ खाते फाईल अडवून ठेवते. त्यामुळे परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजना हे सरकार राबविणार नाही. हे सरकार ओबीसींचे वाटोळे करणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सरकारचे आता दिवस भरले आहेत. अशी टीका वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.
विमा कंपन्याना सरकारला जुमानत नाहीत
राज्यातील ३,९०० गावात सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. सोयाबीन पीक वाया गेले आहे. विमा कंपन्यांना सरकारने 2300 कोटी रूपये दिले आहेत. तरीही या कंपन्या संपूर्ण भरपाई देत नाहीत. पीक विम्याच्या अग्रीम ऐवजी संपूर्ण भरपाई का मिळत नाही याचे सरकारने उत्तर दिले पाहिजे.
अंतर्गत कलहामुळे या सरकारचे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. दिवस ढकलण्याचे काम हे सरकार करत आहे. मलिदा खाण्यात दंग असलेले हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.
ML/KA/SL
18 Oct. 2023