एक बोलायचे आणि दुसरेच करायचे हे कसे चालेल, आता तरी निवृत्त व्हा

 एक बोलायचे आणि दुसरेच करायचे हे कसे चालेल, आता तरी निवृत्त व्हा

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ साली नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेवर येतील असे एकीकडे आम्हाला सांगायचे आणि दुसरीकडे त्यांचा विरोध करायचा , एकीकडे भाजपा सोबत सत्तेसाठी वाटाघाटी करायच्या आणि दुसरीकडे वेगळ्याच लोकांसोबत सत्ता स्थापन करायची हे असे कसे चालेल असा खडा सवाल उपस्थित करीत अजित पवार यांनी आज थेट शरद पवारांच्या वरच हल्लाबोल करीत आता तरी निवृत्त व्हा आणि आम्हाला आशीर्वाद द्या असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर आज अजित पवार गटाचा मेळावा वांद्रे येथील एम आय टी मध्ये झाला त्यावेळी त्यांच्यासोबत बत्तीस आमदार उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ही मोठी गर्दी यावेळी केली होती. छगन भुजबळ, धनंजय मुंडे , रुपाली चाकणकर, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या सगळ्यांनी भाषणे करीत आपण घेतलेला निर्णय कसा योग्य आहे ते सांगायचा प्रयत्न केला आणि अप्रत्यक्षरीत्या यासाठी शरद पवार हेच जबाबदार असल्याचे म्हटले. पवारांना तर बडव्यांनी घेरले असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी यावेळी केला.

सर्वात शेवटी अजित पवार यांनी भाषण केले, आपल्या जोरदार भाषणात त्यांनी आपल्या नेतृत्वावरच हल्ला चढवला , २०१४ , २०१७ आणि २०१९ अशा तीन वेळी भाजपा सोबत शरद पवारांच्या बैठका होऊन सत्तेत सहभागी होण्याचे ठरले होते मात्र प्रत्येक वेळी वेगळी कारणे देत वेगळीच भूमिका घेतली गेली. आम्हाला सांगायचे एक आणि करायचे भलतेच असे प्रत्येक वेळी कसे चालेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २०१७ साली झालेल्या चर्चेत भाजपने शिवसेनेला सोडणार नाही हे मान्य असेल तर सत्तेत या असे म्हटले होते, त्यावेळी शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचे सांगत आयत्यावेळी पवारांनी माघार घेतली. २०१९ साली पाच वेळा बैठका घेऊन सगळे ठरविल्यावर अचानक जातीयवादी ठरवलेल्या शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली असा गौप्यस्फोट अजित पवारांनी यावेळी केला.

माणूस जन्माला आल्यावर कधीतरी निवृत्त होत असतो , शेतकरी देखील मुले मोठी झाल्यावर त्याच्या हातात काम सोपवून आपण मार्गदर्शक बनतात , पवारांनी राजीनामा द्यायचे ठरले होते, सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचे ठरले होते, मी होकारही दिला होता, पण अचानक राजीनामा का मागे घेतला अद्याप समजू शकलेले नाही असे अजित पवार म्हणाले.

आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का असा सवाल उपस्थित करीत पक्षाला मुख्यमंत्री पदाची असलेली संधी का सोडली याचेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. आपण आता निवृत्त व्हा आणि आम्हाला आशीर्वाद द्या असे सांगत अजित पवार यांनी मला अधिक बोलायला लावू नका असा इशारा दिला आहे. ते सभा घेत आमच्यावर आरोप करीत सुटले आणि मला व्हिलन ठरविण्याचा प्रयत्न केला तर आपण ही प्रत्युत्तर देऊ असे ते म्हणाले.

येत्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेत राष्ट्रवादीची ताकद वाढवत अधिकाधिक आमदार , खासदार निवडून आणू असा शब्द देतो , प्रत्येकाच्या मतदार संघात भाजपा , शिवसेना शिंदे गटाला न दुखावता कामे करू आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी प्रयत्न करू असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

ML/KA/SL

5 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *