बोरीवलीत महाकाली नगर गृहनिर्माण घोटाळा उघड; शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

मुंबई, दि १
बोरीवली (पूर्व) येथील देवीपाडा परिसरात महाकाली नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या घोटाळ्यात अमोघ एंटरप्रायझेस, जीएसपी डेव्हलपर्स आणि राईट बिल्टेक प्रा.लि. या कंपन्यांमार्फत नागरिकांना आकर्षक दरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम न करता मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करून तब्बल २०० गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप पीडितांच्या वतीने करण्यात आला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. रूपेश जयस्वाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ठाणे आणि मुंबईतील काही गुंतवणूकदारांकडून तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. यासाठी सुरुवातीला टोकन रक्कम घेऊन हप्त्यांद्वारे पैसे जमा करण्यात आले. गुंतवणूकदारांना प्रकल्पाचे आकर्षक ब्रोशर दाखवून स्वप्नवत चित्र रंगविण्यात आले होते. मात्र, भागीदारांतील वाद, खटले आणि कंपन्यांतील बदल या कारणांमुळे प्रकल्प रखडला.
फसवणुकीचे प्रमाण केवळ काही लोकांपुरते मर्यादित नसून, तब्बल २०० हून अधिक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले आहे. यासाठी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१(२), ३१६, ३१८, ३३६, ३४०, ३१४, ३५१, २२९ व १९८ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, एनसीएलटीने १६ जानेवारी २०२५ रोजी ‘राईट बिल्टेक प्रा.लि.’ ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी एस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडला नियुक्त केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले दावे मांडण्यासाठी कायदेशीर पावले उचलली आहेत.
याप्रकरणी अमोघ एंटरप्रायझेस व जीएसपी डेव्हलपर्सचे प्रतिनिधींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.KK/ML/MS