सिंधुताई यांच्या जन्म भूमितील वारकऱ्यांना , कर्मभूमीत पुरण पोळीचा पाहुणचार

 सिंधुताई यांच्या जन्म भूमितील वारकऱ्यांना , कर्मभूमीत पुरण पोळीचा पाहुणचार

पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  संपूर्ण जगभर अनाथांची माई अशी ओळख असलेल्या आणि वर्धा जिल्ह्याची लेक असणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या जन्मभूमितील वारकऱ्यांना कर्मभूमीत पुरण पोळीचा पाहुणचार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील वारकऱ्यांची श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीतील वारकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील सासवडच्या आश्रमात दोन दिवस मुक्काम केला. यादरम्यान माईंच्या संस्थेत विशेष आदरातिथ्थ्यानें वारकरी भारावून गेले असून मागील पंचवीस वर्षापासून ही परंपरा जोपासली जात आहे.

महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्व अतिशय वेगळे आहे. आषाढ़ी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वरांपासून जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. लाखोंच्या संख्येने वारकरी पायी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. विठ्ठला प्रति आपली भक्ती ते व्यक्त करत आहेत. संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे.

भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात. तसेच वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने वर्धा जिल्ह्यातील जवळपास दोनशे वारकरी मागील २५ वर्षापासून श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीत सहभागी होत असतात. यावर्षी देखील श्रीसंत ज्ञानेश्वर माउली पायदळ वारकरी दिंडी मंडळ वर्धाचे व्यवस्थापक ह.भ.प. कवडूजी महाराज कठाने यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत.

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. त्यांनी पुणे येथे अनाथ मुला-मुलींचे आश्रम स्थापन केले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे वर्धा जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचले. माई हयात असतांना पासून त्या आपल्या जिल्ह्यातील वारकऱ्यांची दोन दिवस संपूर्ण व्यवस्था सासवड येथील ममता बाल सदनमध्ये करीत होत्या. त्यांच्या पश्चात देखील माईंचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड हे त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात असून त्यांनी हि परंपरा कायम ठेवली.

जन्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील रामनगर येथून निघालेली श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी सायंकाळी सासवडच्या संस्थेत पोहोचली. पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी खास वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार करून आदरातिथ्य केले गेले. रात्री काल्याचे कीर्तन आणि हरिपाठ करण्यात आला. सकाळी ही पालखी माऊलीचा जयघोष करीत जेजुरीमार्गे पंढरपूरसाठी रवाना झाली. यावेळी संस्थेतील सर्व मुली, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मुलींनी पावली आणि फुगडी खेळत माउलीचा जागर केला. Hospitality of Puran Poli in Karma Bhoomi to the people of Sindhutai’s birthplace

ML/KA/PGB
17 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *