अश्वप्रेमी युवतींनी २५० किमी घोडेस्वारी करून गाठला चेतक फेस्टीवल
नाशिक, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील हृदया पृथ्वीराज अंडे व जागृती उदय गांगुर्डे या अवघ्या १३ वर्ष व १६ वर्षांच्या दोन युवतींनी अश्वप्रेमी रणरागिणींनी नाशिक ते सारंगखेडा हे अडीचशे किलोमीटरचे अंतर, मजल दरमजल करीत घोड्यावर प्रवास करून पार केले आणि ५ व्या दिवशी चेतक फेस्टिवल गाठले. अश्वाबद्दल प्रेम जागृत व्हावे या उद्देशाने त्यांनी घोड्यावरुन प्रवास केला. त्यांचे सारंखेडा येथील चेतक फेस्टिवल मध्ये वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
चेतक फेस्टिवल मध्ये सहभाग घेण्यासाठी, १७ डिसेंबर रोजी नाशिक येथून निघाल्या. या दोघींनी चांदवड, झोडगे, सोनगीर, दोंडाईचा येथे मुक्काम करीत २५० किलोमीटरचे अंतर घोड्यावर प्रवास करत २१ डिसेंबर रोजी सायंकाळी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल गाठले.
हृदया पृथ्वीराज अंडे हीची ‘हॅट्ट्रीक’ झाली आहे. चेतक फेस्टिवल मध्ये हृदया २०२२ ते २०२४ असे सलग तिसऱ्यांदा सहभाग झाली. तर जागृती उदय गांगुर्डे ही २०२३ व २०२४ या दोन वर्षी सलग सहभागी झाली आहे. हृदया अंडे हिला स्पोर्टची आवड असून ती घोडेस्वारीकडे वळली. अश्वाबद्दल नागरिकांमध्ये प्रेम निर्माण व्हावे यासाठी अडीचशे किलोमीटरचा प्रवास घोडेस्वारी करत केला असल्याचे तिने सांगितले.
SL/ML/SL
23 Dec. 2024