आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचे मानधन दुप्पट

मुंबई, दि. १७ : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील देशांतर्गत संघर्षमय कालावधी म्हणजे आणीबाणी. तत्कालिन पंतप्रधान यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीमुळे हजारो लोकांना तुरुंगवासात जावे लागले होते. देशात सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या (Emergency) कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच मानधनधारकाच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यात आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, तुरुंगवास भोगणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, या बंदीवान नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणीही मान्य झाली आहे. राज्यात सुमारे 15 हजार नागरिकांना ह्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे.
आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना दरमहा वीस हजार रूपये व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस दरमहा दहा हजार रूपये मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीधारकांना दरमहा दहा हजार रूपये तर त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस पाच हजार रूपये मानधन देण्यात येईल. हयात असलेल्या जोडीदारास मानधनासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती 2 जानेवारी, 2018 पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात त्याच्या जोडीदारास शपथपत्र जोडून अर्ज करता येणार आहे.